23/11/2017
ट्रेकिंग...
ट्रेकिंगचं हे असंच असतं...
जिम मधे कितीही धावा,
कितीही मेहनत करा...
डोंगर चढताना
दम लागायचा तो लागतोच...
श्वास फुलायचा तो फुलतोच...
घाम फुटायचा तो फुटतोच...
जिम मधे आपण नक्की काय केलं
असा प्रश्न पडायचा तो पडतोच...
ट्रेकिंगचं हे असंच असतं...
सगळ्याची तयारी ठेवावी लागते...
उन्हासाठी सनब्लॉक, टोपी, गॉगल
पावसासाठी पॉन्चो, वाऱ्यासाठी जॅकेट
थंडी साठी कानटोपी, थर्मल्स, स्वेटर...
याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते...
तरीही जोरात पाऊस यायच्या आत
पॉन्चो घालता येईलच
उबदार गोष्टींचा बंदोबस्त असून
थंडी वाजणार नाहीच
तळपत्या उन्हानं सनबर्न होणार नाहीच
याची काही खात्री नाही...
आपल्याला काय पाहिजे
ते आपण करायचं
निसर्गाला काय पाहिजे
ते तो करतो...
ट्रेकिंगचं हे असंच असतं...
छोट्याश्या सॅक मध्ये
सगळं माववावं लागतं...
निसर्गाशी लढा देण्याची
सगळी अवजारं...
अर्धी चड्डी, पूर्ण विजार
टॉर्च, मेणबत्ती, काड्यापेटी,
औषध, च्याऊम्याऊ, पाण्याची बाटली...
पण टेन्ट मध्ये झोपताना कळतं...
कमी वस्तू आणणाऱ्यांचं
कसंही भागतंच...
भली मोठी सॅक आणणाऱ्यांना
काहीतरी कमी पडतंच!
ट्रेकिंगचं हे असंच असतं...
काहींना उर फुटेस्तोवर
धावायचं असतं...
स्वतःच स्वतःशी शर्यत लावून
त्यात स्वतःच जिंकायचं असतं...
काहींना अजिबात घाई नसते...
दमायच्या आत बसायचं असतं...
सावली दिसेल तिथं पसरायचं असतं...
फुलपाखराच्या मागे पळायचं असतं...
दिसेल त्या तळ्यात डुंबायचं असतं...
कड्या कपारीत
सेल्फी घेत हिंडायचं असतं...
कॅम्पफायरपाशी गाणी गात बसलं की कळतं
जे धावत आले ते खूप दमून गेलेत...
त्यांच्या कडे फक्त आकडेवारीच आहे...
अमक्या वेळात पोचलो...
इतकी पावलं टाकली...
तमुक तमुक वेग होता...
सगळं कसं ऐटीत!
पण त्यांच्याकडे आठवणी कुठं आहेत?
त्यांना फुलांचे रंग कुठं दिसलेत?
झऱ्याच्या तुषारात कुठं चिंब झालेत?
केसांमध्ये वारं शिरल्यावर
वाऱ्याचा वास केसांना लागला
की केसाचा वाऱ्याला
अशी कोडी कुठं पडली आहेत?
शेकोटीची गाणी कुठं सुचताहेत?
त्यांची तयारी चाललीय
सकाळी उठून परत एक
शर्यत जिंकायची...
स्वतःच स्वतःशी...
रेंगाळणारे अजून ही रेंगाळतयात...
चंद्राची वाट बघत, शेकोटी विझवत...
चंद्र गेल्यावर येणाऱ्या
आकाशगंगेची वाट बघत...
आकाशगंगा गेल्यावर
येणाऱ्या सूर्याची वाट बघत...
येणारी, न येणारी गाणी
एकमेकांना ऐकवत...
हसत-खिदळत रडत-सावरत
आलेला, येणारा प्रत्येक क्षण जगत...
ट्रेकिंगचं हे असंच असतं..
आपण कितीही लवकर पोचलो तरी
सूर्य उगवायचा तेव्हाच उगवतो...
कितीही काळजी घेतली तरी
प्रत्येक जण एकदा तरी
घसरून आपटतोच...
कितीही बॅटरी पॅक असले तरी
फोन डिस्चार्ज होतोच...
जवळचं पाणी संपलं की
डोंगर दऱ्यातलं कसलं वसलं
पाणी प्यावं लागतंच...
आणि निसर्गाच्या या
भव्य-दिव्य, राकट-रौद्र,
सुबक, हळुवार रुपापुढं
नतमस्तक व्हावं लागतंच...
ट्रेकिंगचं हे असंच असतं...
ट्रेकिंगचं हे असंच असतं
आणि ट्रेकिंगचं ते तसंच असतं...
पण, मला एक सांगा…...
…..आयुष्याचं तरी काय वेगळं असतं ???
फॉरवर्ड ......