20/03/2026
गिरीविराजची 223 वी मोहिम नुकतेच (१४/१५ मार्च २०२६) जुन्नर - आंबोली (दाऱ्याघाट) येथील " रिठ्याची लिंगी" नामक सुळक्यावर एका नवीनच मार्गाने चढाई करून यशस्वी झाली, सुळक्यावर चढाईसाठी पारंपारीक सोपा मार्ग असूनही संस्थेने आपल्या परंपरेला अनुसरून नवीन मार्गानेच माथा गाठला हे विशेष..
शुक्रवारी रात्री डोंबिवली व पुण्यातून निघून 7 जणांची टीम आंबोली गावात पहाटे भेटली. सुळक्याच्या पायथ्यास असणाऱ्या एका शेतात चार तंबू लावून सेटअप - चहानाश्ता आदि उरकून गणरायाला साकडं घालून दुपारी दोन वाजता टीम बेसकॅम्प वरून निघून प्रत्यक्ष चढाईस प्रदिपला सुरुवात करण्यास चार वाजलेच. पहिल्याच दिवशी चार बोल्ट वापरून त्याने सुमारे चाळीसेक फूट चढाई केली..
दुसऱ्या दिवशी सकाळी तीन जण पुण्यास परतले.. कमलाकर बेस कॅम्पवर तर किरण - प्रदीप - सूरज चढाईस निघाले.. पावणे बारा वाजता सहासष्ट वर्षीय किरण ने प्रत्यक्ष चढाई सुरू केली. प्रदीपच्या साथीने २ बोल्ट, ४ पिटोन, १ पेग वापरत तीसेक फूट चढाई करीत त्याने प्रदीपला पुढील चढाईसाठी पाचारण केले.. प्रदीपने पुढील चढाई करीत १ बोल्ट , १ पिटोन ,३ फ्रेंड ही साधने वापरत दुपारी ठीक ४ वाजून १४ मिनिटांनी माथा गाठून अजून एक मोहीम यशस्वी केली.. माथ्यावर वाइंडअप साठी एक बोल्ट ठोकण्यास आला..
प्रदीप म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ह्या मोहिमेत किरण अडफडकर, अमर दरेकर, सूरज भंडारे, कमलाकर सावंत, समर्थ कोल्हे, सर्वेश कोल्हे आदी सहभागी झाले होते..
एकूण ८ बोल्ट, ५ पिटोन, ३ फ्रेंड व १ पेग ही साधने सदर चढाईत वापरण्यात आली, हे संस्थेचे ७० वे कृत्रिम आरोहण होते..