22/12/2025
इंडियन कॅडेट फोर्स (ICF): राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि साहसाची प्रेरणादायी वाटचाल
छत्रपती संभाजीनगरातील एन.सी.सी.च्या माजी विद्यार्थ्यांनी १९९१ साली स्थापन केलेली इंडियन कॅडेट फोर्स (ICF) ही तरुणांना राष्ट्रसेवा, शिस्त आणि साहसी जीवनाकडे वळवणारी संस्था आहे. ‘सत्य, संकल्प, सिद्धी’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांतून प्रेरणा घेत कमांडर विनोद नरवडे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेची पायाभरणी झाली.
१५ ऑगस्ट १९९७ रोजी भव्य महासंचलनातून ICF ने सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. राष्ट्रीय एकात्मता रॅली, युवक प्रशिक्षण शिबिरे, प्री-सोल्जर ट्रेनिंग कॅम्प, एमपीएससी मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, गणेशोत्सवात विशेष पोलीस अधिकारी म्हणून सेवा, तसेच ओडिशा चक्रीवादळ व गुजरात भूकंपातील मदतकार्य यात संस्थेचा उल्लेखनीय सहभाग राहिला आहे.
साहसी उपक्रम हे ICF चे विशेष बलस्थान आहे. सह्याद्रीतील सिंहगड, रायगड, तोरणा, लिंगाणा, अंकाई यांसह अनेक किल्ले, तसेच हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्प, गंगोत्री, जोगीण-३, सुदर्शन पर्वत, अशा अनेक हिमालयातील गिर्यारोहण मोहिमा आयोजित केल्या आहेत. आयसीएफशी संबंधित शेख रफीक (महाराष्ट्र पोलिस दलातील पहिले एव्हरेस्टवीर) आणि डॉ. मनिषा वाघमारे (मराठवाड्यातील पहिल्या महिला एव्हरेस्टवीर) आणि अलीकडे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलिब्रूस आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो हे दोन्ही शिखर आयसीएफच्या किशोर नावकर, सुरज सुलाने, विनोद विभुते, डॉ. प्रशांत काळे, दत्ता सरोदे यांनी या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे. ही या परंपरेची ठळक उदाहरणे आहेत.
संस्थेचे संस्थापक कमांडर विनोद नरवडे हे उत्कृष्ट संघटक, क्रीडाप्रेमी आणि समाजसेवक आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित नरवडे यांचे स्वप्न ५० एकरांत सैनिकी शाळा उभारण्याचे आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरित सहकारी आयसीएफची राष्ट्रनिष्ठ परंपरा पुढे नेत आहेत.
ICF म्हणजे केवळ संस्था नाही,
तर राष्ट्रासाठी घडणारी एक शिस्तबद्ध, साहसी आणि समर्पित पिढी.
—————————————————
सह्याद्री मित्र संमेलन नाशिक